बनावट फेसबुक अकाउंट बनवून महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:47 PM2019-03-11T20:47:10+5:302019-03-11T20:49:18+5:30
आरोपीने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून अशा पद्धतीने आणखी महिलेची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.
मुंबई - लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर महिलेच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल बनावणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला ना.म. जोशी मार्ग पोलिसांनीअटक केली. आरोपीने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावरून अशा पद्धतीने आणखी महिलेची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
केतन हरीलाल यादव (53) असं अटक आरोपीचं नाव असून तो बोरीवली पूर्व येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. चिंचपोकळी येथे राहणारी पीडित महिलेने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावर वधू नोंदणी केली होती. त्यावेळी आरोपी त्यांच्या संपर्कात आला. तो नवी मुंबईतील सीझर इमारतीत वास्तव्याला असल्याचे सांगून त्याने या महिलेला लग्नाची मागणी घातली. महिलेने गावी राहणाऱ्या भावा व इतर नातेवाईकांना दाखवले. त्यानंतर महिलेचे कुटुंबीय आरोपीला भेटण्यासाठी नवी मुंबईत आले असता त्याने गेस्ट हाऊसमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी आपण जूनी रुम विकली असून पाम बीच रोडवर एक रुम खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, नेहमीच्या या उत्तरामुळे महिला व तिच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या भावाला महिलेचे छायाचित्र पाटवून त्या खाली ही महिला गायब झाली असून बनावट सीमकार्डच्या सहाय्याने फसवणूकीचे काम करत असल्याचा संदेश त्याखाली लिहिला होता. त्याकडे महिला व तिच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केले.
काही दिवसांनी महिलेच्या बहिणीला तक्रारदार महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. त्यावर तक्रारदार महिलेचे छायाचित्र होते. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यावर आरोपी व महिलेचे व्यक्तीगत छायाचित्र आरोपीने अपलोड केले. तसेच आरोपीला कुटुंबियांना दाखवण्यासाठी दिलेले छायाचित्रही आरोपीने अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला. याबाबतची माहिती तक्रारदार महिलेला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास केला असता आरोपी हा वसईतील एका विश्रामगृहात असल्याची माहिती पोलिसांना सापडला. त्यानुसार पोलिसांनी रविवारी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.