एसएस ग्लोबल कंपनीकडून पितापुत्राला २६ लाखाला गंडा
By शीतल पाटील | Published: October 25, 2022 09:05 PM2022-10-25T21:05:44+5:302022-10-25T21:09:00+5:30
SS Global विरोधात पोलिसांत दोन फिर्यादी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून SS Global कंपनीने पितापुत्रांची २६ लाखाची फसवणूक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात सोमवारी पिता-पुत्राने स्वतंत्ररित्या फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित म्हणून मिलिंद बाळासो गाडवे, प्रियांका मिलिंद गाडवे, रवी गाडवे (तिघेही रा. सांगलीवाडी), अविनाश पाटील (रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि चेतन चव्हाण (रा. मिरज) या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासाहेब गाडवे (सांगलीवाडी) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. मिलिंद गाडवे याच्या एस. एस. ग्लोबल सह अन्य काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात २५ गुंतवणूकदारांची दोन कोटी ५ लाख ६० हजार ६९२ रूपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती.
तक्रारदारांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले होते. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी पदभार हाती घेतल्यावर आर्थिक फसवणूकीसंदर्भात संबंधितांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देर सोमवारी कंपनीच्या फसवणूकीविरोधात दोन फिर्यादी दाखल झाल्या. वाहतुक व्यवसाय करणाऱ्या सुशिलकुमार महावीर गोखडे (रा. बालाजीनगर सांगली ) यांना संशयीत आरोपी गाडवे याने एसएसमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास एक वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्याला भूलून गोखडे यांनी कंपनीच्या बॅक खात्यात ९ लाख ३४ हजार ९५० रुपये जमा केले. वर्ष उलटून गेले तरी हाती काहीच रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गाखडे यांनी कंपनीतील संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.
अखेर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयीत पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. तर महावीर कल्लाप्पा गोखडे (रा. बालाजीनगर सांगली ) यांनी त्यांची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. जादा परताव्याच्या आमिषाने त्यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एसएस कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यासह नानाविध कंपन्यांनी नागरिकांना गंडा घातला आहे. आर्थिक फसवणूकीची व्याप्ती मोठी असून पोलीस तपासात कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.