मुलगी झाली म्हणून नवऱ्याकडून चाकूनं वार; सासू, नणदेनं हाताला दिले कापराचे चटके
By विलास जळकोटकर | Published: April 3, 2023 05:37 PM2023-04-03T17:37:03+5:302023-04-03T17:37:34+5:30
पंढरपूर तालुक्यातील घटना : महिलेवर सोलापुरात उपचार
सोलापूर - मुलगा-मुलगी होणं हे काही कोणाच्यात हातात नसतं. पण मुलगाच पाहिजे. वंशाला दिवा हवा अशा भ्रामक कल्पना मानून आजही महिलांवर अत्याचार केले जातात. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे एका विवाहितेला मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी केला. यात नवऱ्यानं चाकूनं वार केला तर सासू अन् नणदेकडून दोन्ही हाताला कापराचे चटके दिले. रेश्मा मारुती शिंदे (वय- ३५, रा. तारापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सोलापूरच्या सिव्हील चौकीत नोंदलेल्या माहितीनुसार यातील जखमी विवाहिता ही पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे राहते. रविवारी सकाळी तिला पती मारुती शिंदे याने मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात रेश्मा हिच्या पायावर चाकूने वार करुन जखमी केले. एवढे कमी झाले म्हणन की काय सासू, नणंद आणि पतीनं मिळून काठीने आणि कापराचे चटके देऊन दोन्ही हातांना जखम केली. यामध्ये जखमी रेशमाच्या सर्वांगास मुका मार लागला.
तिच्यावर उपचार करण्यासाठी नातलग जय धोत्रे यांनी सायंकाळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे.