स्टेट बँकेचे कॉलसेंटर नंबर निघाले बोगस, ग्राहकाला साडेनऊ लाखांचा गंडा, गुगलची घेतली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:13 AM2022-02-01T09:13:33+5:302022-02-01T09:14:03+5:30

Crime News: स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने मोबाइल ॲप सुरू होत नसल्याची तक्रार करण्यासाठी गुगलवर या बँकेचा कॉल सेंटर नंबर मिळवला. मात्र, गुगलवर शोधलेला हा कॉल सेंटरचा नंबर बोगस निघाला

State Bank call center number leaked, bogus, Rs 9.5 lakh scam to customer | स्टेट बँकेचे कॉलसेंटर नंबर निघाले बोगस, ग्राहकाला साडेनऊ लाखांचा गंडा, गुगलची घेतली होती मदत

स्टेट बँकेचे कॉलसेंटर नंबर निघाले बोगस, ग्राहकाला साडेनऊ लाखांचा गंडा, गुगलची घेतली होती मदत

Next

बदलापूर : स्टेट बँकेच्या एका ग्राहकाने मोबाइल ॲप सुरू होत नसल्याची तक्रार करण्यासाठी गुगलवर या बँकेचा कॉल सेंटर नंबर मिळवला. मात्र, गुगलवर शोधलेला हा कॉल सेंटरचा नंबर बोगस निघाला असून याच नंबरवरून बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल साडेनऊ लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रकार बदलापुरात उघड झाला आहे. 
बदलापूर रमेश वाडी परिसरात राहणारे विक्रमसिंग ऐरी (५३) हे मोबाइलमध्ये स्टेस्ट बँक ऑफ इंडियाचे योनो ॲप ओपन होत नसल्याने गुगलवर सर्च करून बँक ऑफ इंडियाचा कस्टमर सर्व्हिस सेंटरचा मोबाइल नंबर मिळवला. या नंबरवरून संपर्क साधला असता समोरून बोलणाऱ्या इसमाने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी केली. विक्रमसिंग यांनी त्याला समस्या सांगितली. त्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे विक्रमसिंग यांनी मोबाइलमध्ये एनी डेस्क नावाचे ॲप डाउनलोड केले. त्यावर बँक व डेबिट कार्डची संपूर्ण माहिती भरली. पासवर्ड आणि युजर आयडी चेंज करून मोबाइलवर आलेला ओटीपी नंबरही ॲपमध्ये भरला. त्यानंतर २४ तासांत पासवर्ड आणि युजर आयडी चेंज झाल्याचा मेसेज येईल, असे सांगून भामट्याने फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विक्रमसिंग यांना तसा मेसेजही आला. त्यामुळे  ते बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून ९ लाख ५३ हजार ३६३ रुपये दुसरीकडे ट्रान्स्फर झाले होते.

विक्रमसिंग यांच्या खात्यात दुसराच नंबर
विक्रमसिंग यांच्या खात्यात दुसरा नंबर ॲड झाला होता. त्या व्यक्तीने इंटरनेटद्वारे आपली फसवणूक केल्याचे विक्रमसिंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक अंकुश मस्के तपास करीत आहेत.

रजिस्टर नंबर बदलून हाेते फसवणूक 
बँकेच्या व्यवहारात काही समस्या आल्यास गूगलवर जाऊन कॉल सेंटरचा नंबर मिळविण्याचा प्रयत्न केला जाताे. असे न करता बॅंकेच्या ऑफिशियल वेबसाइटवरूनच कॉल सेंटरचा नंबर मिळणे गरजेचे आहे. कारण गूगलवर बँकेच्या नावाने कॉल सेंटर नंबर तयार करून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा शोधून काढण्यात आला आहे. 
बोगस नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाला विश्वासात घेऊन त्याच्या मोबाइलमध्ये एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करून ग्राहकाच्या मोबाइलचा ताबा घेतला जाताे. त्यानंतर अकाैंट डिटेल्सच्या आधाराने बँक खात्यात ग्राहकाचा नंबर काढून तेथे स्वतःचा मोबाइल नंबर अपडेट करून रक्कम वळती केली जाते.
डेबिट कार्डच्या डिटेल्सद्वारे बँकेत असलेला ग्राहकाचा मोबाइल नंबर बदलला जातो. त्यामुळे पैसे काढताना येणारे ओटीपी हे बदललेल्या मोबाइल नंबरवर येतात. त्यामुळे बँक खातेधारकाला पैसे हस्तांतरणाचा सुगावा लागत नसल्याने सायबर गुन्हेगारांचे काम साेपे हाेते. यामुळे ग्राहकांनी सावध रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: State Bank call center number leaked, bogus, Rs 9.5 lakh scam to customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.