राज्याच्या गृह विभागाला मिळेना पूर्णवेळ वाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:34 PM2019-03-30T13:34:23+5:302019-03-30T14:05:12+5:30
तीन महिन्यांपासून अतिरिक्ताच्या खांद्यावर कार्यभार : दुसऱ्याऐवजी तिसऱ्या मजल्यावरून चालते कामकाज
जमीर काझी
मुंबई - राज्यातील अकरा कोटींहून अधिक जनता आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या सव्वा लाखाहून अधिक कुमक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा कारभार सांभाळणाऱ्या गृह विभागाला गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णवेळ वाली मिळालेला नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवानंतर सर्वात शक्तिशाली प्रशासकीय पद समजल्या जाणाऱ्या गृह विभागाचा कारभार अतिरिक्त अधिकाऱ्याकडून चालविला जात आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेसंबंधी अनेक प्रलंबित प्रश्न आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही या पदावर सरकारने पूर्णवेळ नियुक्ती न केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
गृह विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला निवृत्त झाले. त्यानंतर गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ३१ मार्चला गृह सचिव पद रिक्त असण्याला तीन महिन्यांचा अवधी पूर्ण होईल. इतक्या प्रदीर्घ कालावधीकरता पूर्णवेळ अधिकाऱ्याविना पद रिक्त असण्याची ही राज्याच्या निर्मितीनंतरची पहिलीच वेळ असल्याचे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस दलासह राज्यातील सुरक्षा यंत्रणा आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) गृह विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असतो. त्यामुळे मुख्य सचिवानंतर गृह विभागाचे सचिवपद महत्त्वाचे समजले जाते. मात्र, सरकारने या पदावरील नियुक्तीचा विषय प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे गृह विभागाचा कारभार दुसऱ्याऐवजी संजय कुमार यांच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयातून चालविला जातोे. आपल्या दालनात बसून गृह विभागाच्या फायली मागवून ते अतिरिक्त कामकाज पाहत आहेत. पोलीस महासंचालकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीही त्यांच्या कार्यालयात घेतात.
गृह सचिवपद रिक्त असल्याबाबत मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. ज्येष्ठ पुरोमागी विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात तपास यंत्रणेच्या दिरंगाईबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी गृह खात्याचा कारभार सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकार गृह सचिवपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, गृह विभागाचे सचिवपद हे सर्वात सेवाज्येष्ठ अप्पर मुख्य सचिवाकडे असते. संजय कुमार हे १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांच्याहून काही ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र त्यांच्याकडे हे खाते सोपवायचे नसल्यामुळेच या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात आला नसल्याची चर्चा अधिकाऱ्यांत आहे.
पद रिक्त ठेवण्यात आलेले नाही
दीड वर्षापूर्वी तत्कालीन गृह सचिव सुधीर पोरवाल हे १५-२० दिवसांसाठी परदेशात गेले होते. त्या कालावधीत अतिरिक्त कार्यभार गृह विभागाच्या प्रधान सचिवाकडे सोपविला होता. हा अपवाद वगळता गृह सचिवपद केव्हाच रिक्त ठेवण्यात आलेले नाही, असे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सांगितले.