मुसळधार पावसात अवैध दारु अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र
By अजित मांडके | Published: July 25, 2024 04:56 PM2024-07-25T16:56:26+5:302024-07-25T16:56:40+5:30
पावसाचा फायदा घेत हातभट्टी सुरु करणाऱ्यांना दणका: गावठी दारुसह २० लाखांचा मुद्देमाल नष्ट
ठाणे: एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असतानाच प्रशासन गाफील असल्याचा समज करुन हातभट्टीची गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या माफियांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलाच दणका दिला आहे. भरारी पथकांसह विविध विभागांनी याठिकाणी धाड भिवंडी आणि देसाई खाडी परिसरात धाड टाकून गावठी दारु आणि दारु निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनासह २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली.
ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. याचाच फायदा घेत गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या माफियांनी भर पावसातच हातभट्टीची दारु निर्मिती सुरु केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पवार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष खाड़ी कामासाठी प्रशिक्षित जवानांनी २४ जुलै २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील देसाई आणि भिवंडी खाडी परिसरात धाडसत्र राबवून हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवलेल्या धाडसत्र मोहिमेच्या अनुषंगाने उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखली कोकण विभागीय भरारी पथक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि भिवंडीतील निरीक्षकांच्या विविध पथकांनी भिवंडी आणि देसाई खाडी परिसरातील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाडसत्र राबविले.
या धाडीत रसायनांचे सुमारे २०० ड्रम्स उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये २२ गुन्हे दाखल केले असून १३ गुन्हे बेवारस अड्डयांच्या मालकांविरुद्ध दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये १४२ लीटर हातभट्टी दारू आणि ५३ हजार लीटर रसायन तसेच इतर साहित्य मिळॅून २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
खाडीमध्ये धाडसी कारवाई
या कारवाईच्या मोहिमेमध्ये बोटीमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मितीची अड्डे उद्ध्वस्त केली आहेत. देसाई गाव, शांतीनगर, सरलाबे, गोरपे गाव, कुंभार्ली गांव आणि भिवंडी तसेच इतर ठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे चालविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८ नुसार गुन्हे दाखल करण्याच्या तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याच्या आदेशही उपायुक्त पवार यांनी दिले आहेत. यानंतरही अशा कारवाई चालूच ठेऊन हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.