राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:37 PM2019-01-31T13:37:33+5:302019-01-31T13:39:04+5:30
मुंबई पोलीस दलात ‘अद्ययावत ई चलान’चा शुभारंभ, एका क्लिकवर मिळणार राज्यभरातील कारवाईची माहिती
मनीषा म्हात्रे
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असतानाच मुंबई वाहतूक पोलीस दलात अद्ययावत ई चलान मशीन दाखल झाल्या आहेत. यामुळे शहरात वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना नव्या मशिन्समुळे राज्यात कोणत्या ठिकाणी, कोणत्या नियमाचा भंग केला तसेच कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच वाहन चोरीचे असल्यास, त्याचाही लेखाजोखा उपलब्ध होणार असल्याने राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडले असतील तरी मुंबईत वाहन चालविताना सावधानता बाळगावी लागणार आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहनचालकांवर कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या ई चलान प्रणालीला अद्ययावत यंत्रणेची जोड देत हा नवा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या मशिन्स हाताळण्याचे प्रशिक्षण वाहतूक पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात आले असून, शहरातील ३४ वाहतूक पोलीस विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागात २० ते २५ मशिन्स देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी आणि अंमलदारांनी या नव्या मशिन्सचा बुधवारपासून कारवाईसाठी वापर सुरू केला आहे. येत्या काळात तब्बल १ हजार १०० मशिन्स वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहेत.
नव्या ई चलान प्रणालीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढले जाते आणि स्वाक्षरी घेतली जाते. वाहनचालकाचा परवाना क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता नोंदविण्यात येतो. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्याने कोणता गुन्हा केला आणि दंडाच्या रकमेची माहिती लघुसंदेशाद्वारे दिली जाते. शिवाय, मेलद्वारे चलन पावती पाठविण्यात येते.नियम मोडणाऱ्याचा वाहन क्रमांक, वाहन परवाना क्रमांक आणि वाहतूक नियम कितीदा मोडले, याचीही संपूर्ण नोंद होते. ही माहिती आता मुंबईपुरती मर्यादित न राहता यामध्ये राज्यभरातील माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच संबंधित वाहनावर कुठे काय गुन्हा आहे? ते वाहन चोरीचे आहे का? शिवाय राज्यात कुठेही कारवाई केली असल्यास, त्याची सर्व माहिती ई चलान मशीनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईत हा प्रयोग यशस्वी होताच, त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे वारंवार नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो.
मुंबईत ११०० मशिनचे नियोजन
मुंबईत अकराशे अद्ययावत मशिन्स दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येत असून त्यानुसार, त्यांचे नियोजन सुरू आहे. प्रयत्न यशस्वी होताच, लवकरच याची माहिती देण्यात येईल. - अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई.
यापूर्वीच्या भूमिका
पुण्यात हेल्मेट सक्ती तसेच नियम मोडणाऱ्यांच्या दंडात वाढ करण्यात आली होती. तसेच थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतली होती.
गुन्हेगारीला आळा
अनेकदा चोर चोरी केलेल्या वाहनाची नंबर प्लेट बदलून त्या वाहनाचा वापर गुन्ह्यासाठी करतात किंवा ते विकतात. मात्र या मशीनमुळे चोरी केलेल्या तसेच विकलेल्या वाहनाचा शोधही घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीलाही चाप बसण्यास मदत होईल.