‘घरी राहून फुकटचे खाते’; नातवाने काठीने केली आजीची हत्या !
By गेापाल लाजुरकर | Published: November 3, 2023 08:06 PM2023-11-03T20:06:41+5:302023-11-03T20:07:08+5:30
ताराबाई पांडुरंग गव्हारे (वय ७५) असे मारहाणीत ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) रा. नवतळा असे आरोपीचे नाव आहे.
गडचिरोली : ‘घरी राहून फुकटचे खाते’ असे म्हणून मद्यधुंद नातवाने मायआजीला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना चामोर्शी तालुक्याच्या नवतळा येथे शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.
ताराबाई पांडुरंग गव्हारे (वय ७५) असे मारहाणीत ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) रा. नवतळा असे आरोपीचे नाव आहे. ताराबाई गव्हारे ही महिला भाऊराव कोठारे याची माय आजी हाेती. ताराबाई ही नवतळा येथे मुलगी व जावई मनोहर कोठारे यांच्या कुटुंबासोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी मनोहर कोठारे हे दारू पिऊन घरी आले. ही बाब भाऊरावला खटकली. त्याने वडिलांसह आईलासुद्धा शिवीगाळ केली.
कुटुंबात भांडण झाले. यावेळी ताराबाईने नातवाला समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाऊरावचा राग अनावर झाला. त्याने वयोवृद्ध आजीला ‘तू आमच्या घरात राहून फुकटचे खातेस’ असे म्हणत लाकडी काठीने हात, पाय व शरीरावर जोरदार मारहाण केली. यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू सकाळी ९ वाजता झाला. या घटनेची चामोर्शी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले; परंतु भीतीपाोटी भाऊरावने आपल्या मोटार सायकलने पळ काढला.
पोलिसांनी आरोपीला पकडण्याची मोहीम राबवली असता चामोर्शी येथील हनुमाननगरात तो लपून बसला होता. तेथूनही त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पाेलिसांनी त्याला तेथून मोटारसायकलसह अटक केली. आरोपीविरोधात ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक प्रभाकर भेंडारे करीत आहेत.