भिवंडीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची सोनसाखळी चोरली
By नितीन पंडित | Published: November 23, 2023 07:09 PM2023-11-23T19:09:44+5:302023-11-23T19:09:50+5:30
आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी: दुचाकीतील पेट्रोल संपल्याने दुचाकी बाजूला पार्क करून बाटलीत पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलेल्या वृद्धाला दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या गळ्यातील ५६ हजार रुपये किमतीचे सोनसाखळी चोरी केल्याची घटना बुधवारी मानकोली नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निळकंठ गंगाधर वैश्विकर वय ६९ वर्ष रा. लोढा अप्पर ठाणे मानकोली नाका असे सोनसाखळी चोरी झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या स्कूटर मधील पेट्रोल संपल्याने त्यांनी आपली स्कूटर मानकोली नाका परिसरात पार्क करून बाटलीतून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले असता तेथे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील दोन इसमांनी आपण पोलीस असून येथे मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी काढून ठेवा असे सांगितले. त्यानंतर या भामट्यांनी हातचालकिने सोन्याची चैन व अंगठी त्यांच्याकडे ठेवून घेऊन दोन छोट्या कागदात दगडाचे खडे गुंडाळून वृध्दाकडे दिले घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळानंतर हे कागदाचे पुड्या वृद्धांनी उघडून बघितल्या असतात त्यात कडे असल्याचे दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.