अवजड वाहने चोरून बनावट कागदपत्रांद्वारे विक्री, दोघांना अटक; पावणेपाच कोटींची ५३ वाहने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 10:07 AM2023-03-04T10:07:31+5:302023-03-04T10:07:43+5:30
काशीमीराच्या सिद्धिविनायक नगरमधील रोझ गार्डनमध्ये राहणारे विनयकुमार पाल यांचा टेम्पो गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या घरासमोरील रस्त्यावरून चोरीला गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : अवजड वाहने चोरून त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडत बनावट कागदपत्रांद्वारे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचे २२ गुन्हे उघडकीस आणत मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ने पावणेपाच कोटींची ५३ वाहने जप्त केली आहेत. या टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.
काशीमीराच्या सिद्धिविनायक नगरमधील रोझ गार्डनमध्ये राहणारे विनयकुमार पाल यांचा टेम्पो गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या घरासमोरील रस्त्यावरून चोरीला गेला होता. काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एकचे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, कैलास टोकले व सुहास कांबळे आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी चोरीचा टेम्पो शोधण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टोल नाक्यांचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र, गुजरात महामार्गावरील टोल नाक्यांचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेत थेट राजस्थानच्या पाटोडी टोल नाकापर्यंत पोहोचले. त्यावेळी तिचा क्रमांक बदलून गुजरातचा झाला होता. तसेच गाडीमध्ये काहीसा बदल केला होता. मात्र, फास्टटॅग व गाडीवरील काही खुणांमुळे ती काशीमीरावरून चोरलेली गाडी असल्याचे पोलिसांनी हेरले. तेथूनच ती गाडी पुन्हा गुजरातच्या अहमदाबाद दिशेने आली. नंतर त्या फास्टटॅगचा संपर्क क्रमांक हा फारूख तय्यब खान (३६, रा. फखरुद्दीनका, पो. टपुग्रा, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान) याचा असल्याने पोलिसांनी त्याला पकडले. सोबत त्याचा साथीदार मुबिन हारिस खान (४०) याला अटक केली.
फारूख हा म्होरक्या असून, दोघेही आरोपी वाहनचालक आहेत. पोलिसांनी दोघांची चौकशी करण्यास सुरवात केली असता त्यांनी चोरलेली ४८ आयशर टेम्पो, २ टाटा टेम्पो, १ अशोक लेलॅण्ड टेम्पो व २ क्रेटा कार अशी तब्बल ५३ वाहने गुजरात, राजस्थान, हरयाणा भागातून जप्त केली. त्या भागातील आणखी १२ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
कमी किमतीत गाड्यांची विक्री
महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांतून वाहने चोरलेली असून, वाहनचोरीचे २०१७ पासून २०२२ पर्यंतचे २२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. वाहने चोरी करून त्यावरील मूळ इंजिन व चेसिस नंबर खोडून त्यावर बनावट तयार केलेल्या कागदपत्रांप्रमाणेच इंजिन व चेसिस नंबर टाकण्यात आले. त्यानंतर विविध आरटीओ विभागात पुनर्नोंदणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे पाेलिस आयुक्तांनी सांगितले.