नागपूरात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गजाआड! कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे दागिने चोरत होते 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:36 AM2021-05-19T00:36:30+5:302021-05-19T00:39:20+5:30

Crime News : गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही.

stealing jewelry from Corona patients in nagpur | नागपूरात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गजाआड! कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे दागिने चोरत होते 

नागपूरात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गजाआड! कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे दागिने चोरत होते 

Next

नागपूर : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या अंगावरचे दागिने आणि मौल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या दोन नराधमांना तहसील पोलिसांनी अटक केली. गणेश उत्तम डेकाटे (वय २४, रा. पार्वती नगर, कळमना) आणि छत्रपाल किशोर सोनकुसरे (वय २५, जुनी मंगळवारी, ढिवर मोहल्ला, लकडगंज) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने,रोख रक्कम, मोबाईल दुचाक्या आणि अन्य चीजवस्तू असा एकूण तीन लाख, ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. नंतर मात्र वडिलांचा मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने अंजली यांनी सोमवारी (१७ मे) तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार जयेश भांडारकर यांनी गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी सुरू केली. 

गुन्हा घडून दीड महिना झाला होता. त्यामुळे आरोपीं बिनधास्त होते. त्यांनी मृत तिवारी यांच्या मोबाईलचा वापर सुरु केला होता. त्याचे लोकेशन कुही परिसरात दिसल्याने तहसील पोलिसांनी आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे यांना सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता पोलीस चक्रावलेच. आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड, आठ लेडीज घड्याळ तसेच रुग्णालयात वापरले जाणारे साहित्य आढळले. त्यामुळे पोलिसांची शंका बळावली. 

डेकाटे आणि सोनकुसरे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्यांना बाजीरावचा हिसका दाखवला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. आरोपी डेकाटे आणि सोनकुसरे हे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे मृतदेह रुग्णालयात प्लास्टिक किटमध्ये पॅक करण्याचे काम करायचे. मृतदेह ताब्यात येताच हे दोघे सोन्याचा गोफ, अंगठी, नथणी, डोरले असे दागिने तसेच मोबाईल, रोख रक्कम काढून घेत होते. त्यानंतर मृतदेह स्मशानात रवाना केला जायचा. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक शोकमग्न असल्यामुळे या नराधमांचे कुकृत्य कुणाच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे ते मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत होते. त्यांनी अशा प्रकारे सात व्यक्तींचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम, हात घड्याळ चोरले होते.

कोरोना किटही चोरली
हे दोघे रुग्णालयातील कोरोना किट तसेच अन्य साहित्याचीही चोरी करायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण तीन लाख, ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारची नागपुरातील अलीकडची ही पहिलीच कारवाई असून अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी आणि एसीपी थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भांडारकर, द्वितीय निरीक्षक बलरामसिंग परदेसी, यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाघ तसेच कर्मचारी लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, नजीर शेख, शंभूसिंग किरार, पंकज डबरे, यशवंत डोंगरे, कृष्णा चव्हाण, गगन यादव आणि अश्विनी यांनी ही कामगिरी बजावली.
 
उद्या मिळविणार कस्टडी
या नराधमांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस त्यांचा कस्टडी रिमांड मिळवणार आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली 

Web Title: stealing jewelry from Corona patients in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.