कोरोना काळात पैशांसाठी चोरीचा मार्ग; सहा दुचाकी केल्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 07:02 AM2022-01-08T07:02:45+5:302022-01-08T07:02:53+5:30
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतील स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या सराईत तीन आरोपींना पकडले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात पैसे कमविण्याचा मार्ग नसल्याने आपण दुचाकी चोरी केल्याचे या आरोपींनी कबूल केले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघड करून सहा चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतील स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिलेले आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना आरोपींची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी व पथकाने तपास करून तीन आरोपींना अटक केली. इरफान शेख (२१), रफिक शेख (२५) आणि विकास गुंजाळ (२२) अशी नावे आहेत.
दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
कोरोना काळात कुठूनही हातात पैसे येत नसल्यामुळे या चोऱ्या केल्याचे आरोपींनी पोलीस चौकशीमध्ये कबूल केले आहे. तिन्ही आरोपींकडून २ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. वालीव येथील एक, नयानगर येथील एक आणि नारपोली येथील तीन असे पाच गुन्हे पोलिसांनी उघड केले आहे. आरोपींना २ दिवसांची कोठडी वसई न्यायालयाने सुनावली.