सावत्र आईने दिले दोघा मुलांना चटके, वालीवच्या फादरवाडी येथील घटनेने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:31 AM2024-08-24T07:31:03+5:302024-08-24T07:31:12+5:30
सनशाइन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या ८ आणि ७ वर्षांच्या मुलांसह राहतात.
नालासोपारा : सावत्र आईने सात वर्षीय अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर तर आठ वर्षीय मुलाच्या हातावर चाकूने चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वालीवच्या फादरवाडी परिसरात घडली. मुलांच्या वडिलांनी गुरुवारी याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
सनशाइन ग्रीन पार्क बिल्डिंग नंबर १ मध्ये नागनाथ सावसगळी हे दुसरी पत्नी नेहा आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या ८ आणि ७ वर्षांच्या मुलांसह राहतात. नागनाथ यांची पहिल्या पत्नीपासून सोडचिठ्ठी झाल्यापासून दोन्ही मुलांचा सांभाळ ते करतात. जूनमध्ये वेळोवेळी आरोपी सावत्र आई नेहा हिने आठ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात घरातील पकडीने मारहाण व हातावर गरम चाकूने चटके दिले तर दुसऱ्या सात वर्षांच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिले. तसेच दोघांना मारहाण करण्याची धमकी देत फरशी पुसणे, झाडू मारणे, भांडी घासण्याची कामे करून घेतली. या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले तर आणखीन मारहाण करण्याची धमकीसुद्धा सावत्र आईने मुलांना दिली होती. अखेर दोन्ही मुलांच्या वडिलांनी वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी तक्रारीनंतर सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. तिने एका मुलाच्या हातावर आणि दुसऱ्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके देऊन मारहाण केली आहे.
- जयराज रणवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वालीव पोलिस ठाणे