शेअर मार्केट गुंतवणुकीतून 20 टक्के रिटर्न्स देणारा 200 कोटी घेऊन पळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:41 PM2022-01-13T14:41:41+5:302022-01-13T14:42:33+5:30
महिन्याला फिक्स पाच ते दहा टक्के रिटर्न देतो अशी एक संबंधिताची स्कीम होती. यासोबतच ‘तो मी आयपीओच्या ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करतो,’ असे सांगायचा.
सोलापूर/बार्शी - तीन महिन्यात दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीतून तब्बल कोटी रुपये गोळा करणारी व्यक्ती अचानक गायब झाली आहे. त्यामुळे, पैसे मिळण्याच्या आशेनं गुंतवणूक केलेल्या लोकांमध्ये आता आपले पैसे मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बार्शीसह तालुक्यात सध्या या शेअर मार्केट गुंतवणूकदारांचीच चर्चा असून सोशल मीडियावरही अनेकांनी याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.
महिन्याला फिक्स पाच ते दहा टक्के रिटर्न देतो अशी एक संबंधिताची स्कीम होती. यासोबतच ‘तो मी आयपीओच्या ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करतो,’ असे सांगायचा. त्यातून दर महिन्याला दोन आयपीओ होतात, असे सांगत एक आयपीओला साधारणपणे १५ ते २० टक्के रिटर्न आले असे सांगत मुद्दल, व्याज कंपौंडिंग करीत पुढील आयपीओला लावून महिन्यात ३० ते ३५ टक्के रिटर्न मिळवून देतो म्हणत गुंतवणूकदार आकर्षित करीत होता.
पाच ते कोट्यवधींच्या गुंतवणुका
जुन्या लोकांना त्याने १० टक्के रिटर्न दिले आहेत. यासोबतच अल्गो ट्रेडिंग करतो. तेजीनुसार रोज २ टक्के रिटर्न देतो असे तो म्हणत असे. त्याच्या स्वतःच्या तीन कंपन्या होत्या. विविध बँकांत खाती होती. तो अकौटं आणि कॅश रक्कमही घेत असे. कमीत कमी पाच लाख ते कोट्यवधी रुपयांची त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. बेसिक मुद्दलाचा आकडाही ७० ते १०० कोटींचा असावा, अशी चर्चा आहे. कित्येक लोकांनी घर, जमीन गहाण ठेवून, सोने बँकेत ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. बार्शी व परिसरासोबत त्याच्याकडे पुणे, सांगली भागांतीलही अनेकजणांच्या गुंतवणुकी होत्या.
रविवारी कुटुंबासमवेत पसार
रविवारी पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला घेऊन तो पसार झाला आहे. त्या दोघांचा मोबाईल त्या दिवशीपासून बंद आहे. त्यामुळे त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचे वडील हे शिवाजी शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक होते. तो मूळचा मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी गावचा आहे. सुरुवातीला तो शिवाजी कॉलेज रोडवर इंटरनेट कॅफे चालवीत होता. बार्शीत विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेस नावाने उपळाई रोड, भगवंत सहकारी बँक, दुसरा मजला येथे त्याने कार्यालय थाटले होते.
आठवड्यात दोघे पळाले; २०० कोटींना चुना
या आठवड्यात दोघेजण असे पळून गेल्याने बार्शीत खळबळ उडाली आहे. दोघांनी मिळून साधारण ३०० कोटींना चुना लावला आहे. अद्याप कोणी पोलिसांत तक्रार दिलेली नाही. बहुतेकांनी त्याच्या कंपनीच्या खात्यावर पैसे जमा केले, तर काहींनी रोख रकमा दिल्या आहेत.