धुळ्यात एका पत्र्याच्या शेडमधून स्पिरीटचा साठा जप्त, एकाला अटक
By देवेंद्र पाठक | Published: September 22, 2023 03:45 PM2023-09-22T15:45:51+5:302023-09-22T15:46:32+5:30
याप्रकरणी महेंद्र बाबूसिंग गिरासे (वय ४५, रा. आमोदे ता. शिरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारातील एका पत्र्याच्या शेडमधून ५३ हजार ६०० रुपयांचा स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी महेंद्र बाबूसिंग गिरासे (वय ४५, रा. आमोदे ता. शिरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारातील संगीता लॉजच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये स्पिरीटचा अवैध साठा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिरपूर येथील दुय्यम निरीक्षक ए. सी. मानकर यांना मिळाली. माहिती मिळताच मानकर यांच्यासह पथकाने धाड टाकली.
पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता त्याठिकाणी स्पिरीट भरलेले २५० लिटर क्षमतेचे दोन आणि ३५ लिटर क्षमतेचे ९ प्लॅस्टिकचे ड्रम आढळून आले. पथकाने घटनास्थळावरून महेंद्र गिरासे या संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित महेंद्र गिरासे याच्या ताब्यातून ५३ हजार ६०० रुपये किमतीचा स्पिरीटचा साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे निरीक्षक डी. पी. नेहूल, हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक ए. पी. मते, दुय्यम निरीक्षक ए. सी. मानकर, सहायक दुय्यम निरीक्षक ए. बी. निकुंभे, जवान केतन जाधव, शांतीलाल देवरे, मनोज धुळेकर,रवींद्र देसले यांच्या पथकाने केली आहे.