रिव्हॉल्व्हरच्या धाकाने शेअर दलालाचे अपहरण, ५० लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:06 AM2020-10-29T02:06:28+5:302020-10-29T02:07:07+5:30
Crime News : आरोपींनी ५० लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये उकळले. याप्रकरणी रोहित कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली.
ठाणे : शेअर बाजारात गुंतवलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर नवी मुंबईतील एका ४० वर्षीय शेअर दलालाचे अपहरण केल्याची घटना उजेडात आली. आरोपींनी ५० लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये उकळले. याप्रकरणी रोहित कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली.
नवी मुंबईच्या या शेअर दलालाचे ठाण्याच्या कोपरीमध्ये कार्यालय आहे. त्यांच्या दलालांमार्फत अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. प्रथमेश मोहिते यांनीही ९२ लाखांची गुंतवणूक केली होती. मार्च माहिन्यात लॉकडाऊनमुळे बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचा दरमहा परतावा बंद झाला. ४० लाख रुपये टप्प्याप्प्याने तर उर्वरित रक्कम पाच ते सहा महिन्यांनी देतो, असे या दलालाने सांगितले. मात्र, २३ ऑक्टोबर रोजी किशोर आढाव याच्यासह चौघांनी ठाण्यातील कार्यालयात त्याला गाठून प्रथमेश मोहिते यांनी पाठविल्याचे सांगितले. त्यांनी या दलालास ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. रिव्हॉल्व्हरची मूठ खांद्यावर मारून त्याला एका वाहनातून त्याच्या घरी आरोपींनी नेले. त्यानंतर त्याच्याकडून पाच लाख रुपये घेऊन, नंतर प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये देण्याच्या अटीवर सोडले.
दोघांचा शोध सुरु
याप्रकरणी २४ ऑक्टोबर रोजी दलालाने तक्रार केल्यानंतर कोपरी पोलिसांनी २५ ऑक्टोबर रोजी सापळा रचून हप्ता घेण्यासाठी आलेल्या रोहित आणि किशोर याला पाठलाग करून अटक केली. यातील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.