स्पोर्टस् क्लबमधून बाथटब गेला चोरीस; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 06:54 PM2019-08-26T18:54:44+5:302019-08-26T18:58:04+5:30
वाशीतली घटना; सुरक्षारक्षकाच्या पाहणीत प्रकार झाला उघड
नवी मुंबई - स्पोर्टस् क्लबमधून बाथटब चोरीला गेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. क्लबच्या चेंजिंग रुममधून चोरटय़ांनी हा बाथटब लंपास केला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दिवसा तसेच रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे घडत आहेत. त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकड व इतर साहित्य चोरीला जात असल्याचे दिसून येते. मात्र, वाशीत आश्चर्यजनक घटना घडली आहे. वापरात असलेला बाथटब चोरीला गेल्याचा प्रकार शहरात पहिल्यांदाच घडला आहे. वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् क्लबच्या (एन.एम.एस.ए.) चेंजिंग रुममध्ये हा बाथटब बसवण्यात आला होता. संबंधित रुम दररोज रात्री स्पोर्ट क्लब बंद झाल्यानंतर कुलूप लावून बंद केल्या जातात. मात्र, रविवारी सकाळी सुरक्षारक्षकाच्या पाहणीत तिथल्या चेंजिंग रुमचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यामुळे त्याने आतमध्ये जावून पाहिले असता सामान विस्कटून पडले होते. तर बाथटब त्याठिकाणी नसल्याचेही आढळून आले. यामुळे सुरक्षारक्षकाने हा प्रकार स्पोर्टस् क्लबच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेच्यादरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर बाथटबची पाहणी करुनच तो चोरण्यात आला असावा असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, सुमारे पाच फुट लांबीचा आणि तीन फुट रुंदीचा हा बाथटब स्पोर्टस् क्लबमधून बाहेर नेला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा उलगडा क्लबच्या आवारातील अथवा परिसरातील सीसीटीव्हीमधून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.