प्रवाशाला चोरीला गेलेला मोबाइल सापडला मृताच्या खिशात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 03:56 PM2019-11-15T15:56:39+5:302019-11-15T15:58:23+5:30
वडाळा रेल्वे पोलिसांची कारवाई
मुंबई - वाशी येथून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने नामांकित कंपनीचा ५० हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. काही तासांनी अज्ञात प्रवाशाचा लोकल अपघातात मृत्यू झाला. त्याच्याकडे सापडलेला मोबाइल चोरीचा असल्याचे समजून आले. त्यानंतर वडाळा रेल्वेपोलिसांनी संपूर्ण प्रकाराचा छडा लावला.
मंगळवारी घाटकोपर येथे राहणारे तक्रारदार प्रवासी संतोष गुप्ता (२६) वाशी येथून प्रवास करत होते. पहाटे ५.१९ वाजता वाशी येथून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल पकडली. त्यांनी मोबाइल पॅन्टच्या खिशात वरच्या वर ठेवून झोपून प्रवास केला. गुप्ता यांना गाढ झोप लागली. या झोपेचा फायदा घेत चोरट्याने ५० हजार किंमतीचा मोबाइल चोरी केला. यासंदर्भात गुप्ता यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता रे रोड ते कॉटग्रीन रेल्वे स्थानकांदरम्यान अज्ञात प्रवाशाला लोकलची ठोकर लागली. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत प्रवाशाची तपासणी केली असता, नामांकित कंपनीचा ५० हजार रुपयांचा मोबाइल मिळाला.
या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक चोरी झालेल्या आयएमईआय क्रमांकासारखा होता. त्यामुळे हा मोबाइल चोरीचा असल्याचे आढळून आले. वडाळा रेल्वे पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला, तेव्हा मृत प्रवासी झारखंड येथील असल्याचे समजले. आरिफ शेख (२२) याने चोरीचा मोबाइल आपल्यासोबत बाळगला होता. पोलिसांनी मृत प्रवाशाच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. मृत प्रवाशाचे प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.