चोरीच्या रिक्षाला बनावट क्रमांक लावून वापर, महिलेसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:40 PM2023-03-21T21:40:29+5:302023-03-21T21:40:39+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: रिक्षा हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रिक्षा चोरल्यानंतर तिच्यावर बनावट नंबरप्लेट लावून तिचा प्रवासी भाड्यासाठी वापर करणाऱ्या नजमा अब्दुल सलाम शेख (५३) या महिलेसह अन्सार उस्मान शेख (३८) अशा दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक रिक्षाही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी मंगळवारी दिली.
डोंबिवली, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी रिक्षा चोरीस गेली होती. तिची मूळ नंबर प्लेट काढून त्याऐवजी बनावट नंबर प्लेट लावून तिचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलिस हवालदार एस. एम. बाबर यांना मिळाली होती. खंडणीविरोधी पथकाने मानपाडा, खोणी गाव येथील अन्सार शेख याला १८ मार्च रोजी ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये ही रिक्षा नजमा हिने त्याला विकल्याचे सांगितले. ओळख पटू नये म्हणून त्याने रिक्षाची मूळ नंबर प्लेट काढून त्यावर बनावट क्रमांकाची नंबरप्लेट लावून ही रिक्षा प्रवासी भाड्याकरिता वापरत असल्याची कबुली दिली. त्यानंतर नजमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तिनेही या गुन्ह्याची कबुली दिली. ही रिक्षा खोणी पलावा येथून चोरल्याचे सांगितले. मुंब्र्यातील नासीर नाजीर खान याने दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने या दोघांनाही मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.