मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला; आंध्र प्रदेश पोलिसांनी मंदिरात काम करणाऱ्यांवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:21 PM2019-02-04T15:21:52+5:302019-02-04T15:23:13+5:30
शनिवारी सायंकाळी प्रसाद वाटपाच्या वेळी ही चोरी झाल्याचा संशय मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चेन्नई - अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मूर्तींचे मौल्यवान मुकूट चोरीला गेले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या तिन्ही मुकुटांचं वजन हे जवळपास ४ किलोग्रॅम असून ज्या मंदिरात ही चोरी झाली आहे. ते बाराव्या शतकातील मंदिर असल्याची माहिती मंदिर अधीक्षक ज्ञान प्रकाश यांनी दिली. शनिवारी सायंकाळी प्रसाद वाटपाच्या वेळी ही चोरी झाल्याचा संशय मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. चोरीस गेलेल्या मुकुटाची किंमत १.५ कोटी इतकी आहे. याप्रकरणी मंदिर प्रशासनाकडून तिरुपती पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मुकूट व्यंकटेश्वर, श्री महालक्ष्मी आणि श्री पद्मावती या देवतांच्या मूर्तींचे आहे. सोन्याचे आणि हिरेजडित असे हे अतिशय मौल्यवान मुकूट चोरीला गेल्याचं लक्षात येताच मंदिर प्रशासन आणि परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रसाद वाटपाच्या वेळेत सायंकाळी ५ वाजल्यापासून, ते ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येतं. याचदरम्यान, जेव्हा पूजारी म्हणून मंदिरात काम पाहणाऱ्या हरिकृष्ण दीक्षितुलू यांनी विजयसारादी या पुजाऱ्यांकडून मंदिराची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी मुकूट चोरीला गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.पोलिसांनी १५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासासाठी ताब्यात घेतले असून तिरुपतीचे पोलीस अधीक्षक अंबुराजन यांनी सांगितले की, मंदिरात काम करणाऱ्या कामगार आणि कंत्राटी कामगारांवर पैकी कोणीतरी बाहेरच्या चोराला मदत केल्याशिवाय हा गुन्हा घडलेला नाही. त्यामुळे आम्हाला मंदिरातील कामगारावर संशय आहे. लवकरच संशयिताला ताब्यात घेतलं जाईल.