शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:11 PM2022-12-27T17:11:56+5:302022-12-27T17:12:56+5:30
वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते.
अनिल उंबरकर -
शेगाव : शेगाव-वरवट मार्गावरील एका विहिरीत चोरीच्या दुचाकी टाकून दिल्याचा उलगडा संशयित आरोपीकडून करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. विहिरीतून मंगळवारी दुपारपर्यंत १५ दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. त्याचप्रमाणे शेगाव परिसरातील आणखी काही विहिरीमध्ये दुचाकी असल्याचा संशय असल्याने शोध घेणे सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी दिली. शहरातील विविध शासकीय कार्यालय, हॉस्पिटल व इतरही सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. दुचाकी चोरणारी टोळीच बुलढाणा जिल्ह्यात सक्रिय होती. दरम्यान, पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सय्यद वसिम सय्यद इस्लाम (३८) याला ताब्यात घेत चौकशी केली. या वेळी सय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सय्यद वसिमने गुन्ह्याची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती दिली. त्याच्यासोबत आणखी काही जण या टोळीत असून, पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहिरीत टाकत होते. चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दुचाकींचा शोध घेत आहेत.