ढंढाणे गावात दगडफेक, पोलिस उपनिरीक्षकासह आठ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:35 IST2024-04-04T13:35:03+5:302024-04-04T13:35:15+5:30
लोकनाट्याच्या कार्यक्रमात गाणे लावण्यावरून झाला वाद

ढंढाणे गावात दगडफेक, पोलिस उपनिरीक्षकासह आठ जण जखमी
- अतुल जोशी
धुळे : तालुक्यातील ढंढाणे येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित लोकनाट्याच्या कार्यक्रमात गाणे लावण्यावरून एका गटाने वाद घालून दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षकासह सात ते आठ ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. घटना घडल्यानंतर गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
तालुक्यातील नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ढंडाणे गावात भवानी देवीचा बुधवारी यात्रोत्सव होता. त्यानिमित्ताने लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गाणे लावण्यावरून एका गटाने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. गावकरी व बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका गटातील जमावाने अंधाराचा फायदा घेत दगडफेक सुरू केली. दगडाचा मारा अनेकांना बसला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र हिरे हे गेले असता, त्यांच्याही कपाळावर दगड लागल्याने, ते जखमी झाले. त्यांच्यासह सात ते आठ ग्रामस्थ जखमी झाले.
जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह ५० ते ६० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा गावात पोहचला. गावात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असून, तेथे आता तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.