टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल
By योगेश देऊळकार | Published: April 28, 2024 02:14 PM2024-04-28T14:14:24+5:302024-04-28T14:14:36+5:30
घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
संग्रामपूर : लग्नाच्या वरातील नाचत असताना दोन गटात तणाव निर्माण झाल्याने दगडफेकीची घटना संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. त्यामध्ये दोन्ही गटातील ७ ते ८ जण जखमी झाले, त्यातील २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जळगाव जा. पोलिस ठाण्यातील पोलिसांसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले. सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधातील फिर्यादीवरून ४१ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात सुरेश तात्या कोष्टी यांनी तक्रार दिली. त्यानुसार एका गटातील २९ जणांवर भादंवि कलम १४३,१४७,१४९,३३७,४२७, १३५ मपोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच शेख शोयब शेख युसूफ याच्या तक्रारीवरून १६ आरोपींवर भादंवि कलम १४३,१४७,१४९,३३७,४२७ सह कलम १३५ मपोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
शनिवारी रात्री टुनकी गावात तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळविले. परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. टुनकी येथे शांतता असून गावात बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- चंद्रकांत पाटील,
(ठाणेदार, सोनाळा ता. संग्रामपूर)