शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील बंगल्यावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:29 PM2021-08-24T21:29:12+5:302021-08-24T21:47:57+5:30
Stone pelting at Shiv Sena MP Vinayak Raut's bungalow : सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून याबाबत पोलीसांना माहिती दिल्याचे सांगितले.
सावंतवाडी : शिवसेना नेते खासदार विनायक राउत याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव मालवण येथील बंगल्यावर अज्ञात व्यक्तीनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली असून चार ते पाच व्यक्ती दुचाकीने आल्या होत्या, असे राऊत यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून याबाबत पोलीसांना माहिती दिल्याचे सांगितले.
राऊत यांचे निकटवर्तीय नागेंद्र परब यांनी या घटनेला दुजोरा देत पोलीसांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले तसेच हे चार ते पाच दुचाकी स्वार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले या घटनेची माहिती दिल्ली येथे खासदार विनायक राऊत यांना देण्यात आली आहे,असे परब म्हणाले. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटके चे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून येत असून पोलीसांकडून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. यासंपूर्ण प्रकरणावरुन आज दिवसभर मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहेत. ठिकठिकाणी राणेंविरोधात आंदोलनं आणि निदर्शनं सुरू होती. अखेर राणेंना अटक झाल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. राऊत सध्या दिल्ली येथे असून त्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत जोरदार टिका करत पंतप्रधानांना पत्र लिहून राणेचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली होती. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणाची दखल घेऊन त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावीअशी मागणी करणारं पत्र विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. या पत्रावर मोदींनी १० मिनिटांत प्रतिक्रिया दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी माझं म्हणणं ऐकून घेत तुम्ही याबाबची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांची भेट घ्या, असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं.