नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता 

By अझहर शेख | Published: August 22, 2022 12:01 AM2022-08-22T00:01:48+5:302022-08-22T00:01:57+5:30

जुन्या हल्ल्याची कुरापत; पोलिसांचा फौजफाटा दाखल

Stone pelting storm in two groups in Nashik; A tense silence | नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता 

नाशिकमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; तणावपूर्ण शांतता 

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळ पोलीस चौकीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टींमधील दोन गट समोरासमोर भिडले. रविवारी (दि.२१) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांसह दंगलनियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यामुळे परिसरात रात्री उशीरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते.

गंजमाळ पोलीस चौकीच्या परिसरात असलेल्या भीमवाडी, व समोरील बाजूने असलेल्या गंजमाळ, पंचशीलनगर भागातील दोन गट एकमेकांच्यासमोर भिडले. जुन्या प्राणघातक हल्ल्याची कुरापत काढत दोन गटांकडून भर रस्त्यात दगडफेक करण्यात आली. यावेळी अचानकपणे सुरू झालेल्या या राड्याने परिसरात धावपळ उडाली. जमलेला जमाव एकमेकांच्या दिशेने धावाधाव करु लागल्याने व्यावसायिकांनी त्यांची दुकाने त्वरित बंद केली. तसेच रस्त्यावरील वाहतुकदेखील थांबली होती. शालिमारकडून द्वारकेकडे व द्वारकेकडून शालिमारकडे जाणारी वाहतुक यामुळे खोळंबळी. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडफेकीत एका वाहनाचे नुकसान झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखा युनिटकडून परिसरात शोधमोहिम राबवत समाजकंटकांची धरपकड केली जात होती.

चोख पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. गंजमाळ येथे तणावपुर्ण शांतता पसरलेली होती. रात्रभर या भागात फिक्स पॉइंट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मागील वर्षी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या हल्ल्याची कुरापत काढत दोन्ही बाजूंचे गटांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका रिक्षाचे नुकसान झाले. परिसरात बंदोबस्त तैनात असून संशयितांचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- दत्ता पवार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे.

Web Title: Stone pelting storm in two groups in Nashik; A tense silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.