गुंडाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:30 PM2019-10-08T21:30:08+5:302019-10-08T21:32:51+5:30
पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तीन ठिकाणी पथके पाठवली आहेत.
यड्राव - येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील बऱ्याच वर्षापासून बंद असलेल्या प्रोसेस इमारतीमध्ये गुंडाच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अनिल शिवाजी मसाळ (वय वर्षे २५) रा. संगमनगर खोतवाडी ता. हातकणंगले असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तीन ठिकाणी पथके पाठवली आहेत.
अनिल मासाळ हा २०१६ साली इचलकरंजी येथील भगतसिंग बागेजवळ घडलेल्या हत्येप्रकरणात संशयित आरोपी आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तसेच त्याला गांजाचे व्यसन होते. चार दिवसापूर्वी त्याचा एका व्यक्तीसोबत वादावादी झाली होती. त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे. हत्या झाली त्या घटनास्थळी मृतदेहाजवळ गांजा, चिलीम पडली होती. डोक्यात मोठा दगड घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. ही हत्या दोन किंवा तीन व्यक्तींनी मिळून केल्याचा अंदाज आहे. गांज्याच्या धुंदीत मित्रांनीच हत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळाच्या इमारतीसमोरील कारखान्याच्या सीसीटीव्हीमध्ये संशयित आढळून आल्याचे समजते. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक के एन पाटील, सपोनि राजेंद्र यादव, सपोनि गणेश खराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी, कोल्हापूर येथील ठसे तज्ञ जी एस पाटील, सपोनि डी एन पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली "स्टेला" "श्वानपथक घटनास्थळी येवून गेले.