माझ्या मुलाच्या खुनाच्या घटनेवरून सुरु असलेलं राजकारण थांबवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:09 PM2019-08-09T13:09:55+5:302019-08-09T13:17:47+5:30
समाजातील लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून चारित्र्य खराब करण्याचे काम करण्यात येत असून, माझी बदनामी करण्यात येत आहे,
पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पिंपरी येथे हितेश मूलचंदानी या तरुणाचा दि. २३ जुलै रोजी खून झाला होता. या घटनेवरून राजकारण सुरू असून, ते थांबविण्यात यावे, आम्हाला न्याय पाहिजे आहे, अशी मागणी खून झालेल्या हितेश याचे वडील गोदूमल मूलचंदानी यांनी केली. तसेच, याप्रकरणी माजी उपमहापौर हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांनी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार आमदार चाबुकस्वार यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजातील लोकांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून चारित्र्य खराब करण्याचे काम करण्यात येत असून, माझी बदनामी करण्यात येत आहे, असे डब्बू आसवानी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हितेश मूलचंदानी यांच्या खूनप्रकरणी लोकांना दमदाटी करून दबाव आणत आहेत, अशी तक्रार आसवानी यांनी दिली आहे. त्यानुसार आमदार चाबूकस्वार यांच्यासह जितू मंगतानी, सुरेश निकाळजे, राजू नागपाल व किशोर केशवानी यांच्या विरोधात बुधवारी (दि. ७) अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
माझ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची अद्याप माहिती नाही. त्याची प्रत मला मिळालेली नाही. तसेच फोन रेकॉर्डिंग बाबतही माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी माझी भूमिका स्पष्ट करेन. - गौतम चाबूकस्वार, आमदार, पिंपरी.