विचित्र घटना! स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवून सुतळी बॉम्ब फोडला; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:59 PM2022-10-27T14:59:54+5:302022-10-27T15:00:35+5:30
अनेकदा लहानपणी फटाके फोडताना वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जातात. कधी दगडांमध्ये फटाके ठेवून, कधी भांड्याखाली कधी बॉटलमध्ये ठेवून फटाके फोडले जातात. असाच एक प्रयोग १६ वर्षांच्या मुलाच्या जिवावर बेतला आहे.
छत्तीसगढच्या कोरियामध्ये फटाके फोडताना एक विचित्र घटना घडली आहे. अनेकदा लहानपणी फटाके फोडताना वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जातात. कधी दगडांमध्ये फटाके ठेवून, कधी भांड्याखाली कधी बॉटलमध्ये ठेवून फटाके फोडले जातात. असाच एक प्रयोग १६ वर्षांच्या मुलाच्या जिवावर बेतला आहे.
या मुलाने सुतळी बॉम्ब स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवून पेटविला. त्याच्या आजुबाजुला विटा आणि ग्लासावरही वीट ठेवली. बॉम्ब फुटताच स्टीलच्या ग्लासाचे तुकडे झाले आणि त्यातील एक तुकडा उडून मुलाच्या छातीत जाऊन घुसला. यामुळे या मुलाचा मृत्यू झाला.
जगत सिंह हा मुलगा त्याच्या नातेवाईकाकडे राहत होता. त्याच्या आईचा आधीच मृत्यू झाला होता, वडील घरीच असतात. दिवाळीला तो त्याच्या मित्रांसह फटाके वाजवत होता. यावेळी त्याला एक कल्पना सुचली आणि तो स्टीलचा ग्लास घेऊन आल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.
ग्लासाच्या आजुबाजुला विटा ठेवल्या आणि त्यात बॉम्ब ठेवला. वरून बॉम्बला आग लावत विटेनेच पॅक केला. तेवढ्यात बॉम्ब फुटला. या वेळी जगतला तिथून पळण्याची संधी मिळाली नाही. बॉम्ब फुटताच ग्लासाचे तुकडे झाले आणि जगतच्या छातीत घुसले. यामुळे जगत तिथेच बेशुद्ध पडला. मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले परंतू डॉक्टरांनी त्याला अती रक्तस्त्राव झाल्याने मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोस्टमार्टेममध्ये त्याच्या शरीरातून ग्लासचे तुकडे काढण्यात आले.