खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:34 PM2021-04-22T19:34:50+5:302021-04-22T19:35:53+5:30
Double Murder in Jalgaon : कुसुंबा येथील घटना : कारण गुलदस्त्यात
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. आशाबाई यांचा मृतदेह किचनच्या बाजुच्या खोलीत तर मुरलीधर यांचा मृतदेह गच्चीवर होता. कारण व मारेकरी अजून निष्पन्न झाले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील ओम साई नगरात मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई असे दोघेच राहत होते. मोठी मुलगी शीतल हिरालाल पाटील (२४,रा. वेले, ता.चोपडा) ही कुसुंबा येथे तर लहान मुलगी स्वाती उमेश पाटील ही (२२,रा.सावखेडा ता. यावल) ही नंदुरबार येथे वास्तव्याला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता स्वाती ही आई वडिलांना फोन करत होती, परंतु त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.त्यामुळे तिने याच परिसरात राहणारी आजी रुखमाबाई लक्ष्मण पाटील हिला फोन करून आई, वडीलांशी संपर्क होत नाही, काय झाले आहे ते जावून बघ असे सांगितले. त्यानुसार रुक्माबाई या जावई संतोष कुंडलिक पाटील (रा.कुसुंबा) यांना सोबत घेऊन मुरलीधर पाटील यांचे घर गाठले असता घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता, तर मागील किचनकडील दरवाजा उघडा होता. बाजूच्या खोलीत मुलगी आशाबाई मृतावस्थेत पडलेले होती हे दृश्य पाहून रुखमाबाई व संतोष पाटील यांना धक्का बसला. त्यांनी घराची पाहणी केली असता कपाट उघडे होते तर गच्चीवर मुरलीधर पाटील हे देखील मृतावस्थेत दिसून आले. पती-पत्नीचा खून झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. दुपारी चार वाजता ही घटना पोलिसांना समजली.
रात्रीच झाला आहे खून
मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. शरीरावरील व्रण पाहता ही घटना रात्रीच घडण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. गच्चीवर मुरलीधर पाटील यांच्या मृतदेहाजवळ महिलेची चप्पल आढळून आली, हि चप्पल आशाबाई यांचे नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय फोर्स मध्ये खाट पडलेली होती, त्यावर अंथरूण होते. पाटील खाटेवर झोपण्याचा संशय असून मारहाण करणार्यांनी त्यांना गच्चीवर आणले असावे याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मृतदेहापासून काही अंतरावर दोरी आढळून आली आहे.
रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद
घटनास्थळावर आलेले मुरलीधर पाटील यांचे भाऊ विलास राजाराम पाटील व साडू संतोष पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता, त्यामुळे या वादाचा आणि घटनेचा काही संबंध आहे का? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी चोरी अन् वाद
मुरलीधर पाटील यांची मुलगी शीतल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी जुन्या घरात वास्तव्याला असताना शेजारी राहणाऱ्या एका जणांने त्यांच्या घरात ४० हजार रुपये रोख व दागिन्यांची चोरी केली होती. तेव्हा त्याच्याशी वडिलांचा वाद झाला होता. त्यावेळी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या वादाचाही या घटनेशी संबंध आहे का? याची माहिती पोलिसांकडून काढली जात आहे.
ब्रोकरकडे कामाला होते पाटील
मुरलीधर पाटील हे महाबळ मधील दिलीप कांबळे या ब्रोकरकडे कामाला होते.शेती, प्लॉट यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांना कमिशन मिळत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या भागात नवीन घराचे बांधकाम हाती घेतले होते. जुलै महिना ते येथे वास्तव्याला गेले दोन मजली आलिशान घर त्यांनी या ठिकाणी बांधलेले आहे. या घरात ते फक्त पती-पत्नी असेच राहत होते.
अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब
आशाबाई यांच्या अंगावर पाच लाखाचे दागिने होते. त्याशिवाय घरातील कपाटात येईल काही रक्कम होती हे दागिने व रक्कम गायब झाल्याची माहिती मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांनी दिली.
एसपींकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकारी दाखल झाले. फाॅरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सर्वात आधी सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना माहिती कळविली.