भटक्या कुत्र्यांमुळे झाला हत्येचा उलगडा; चार तासात पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:47 AM2020-10-13T00:47:52+5:302020-10-13T00:48:29+5:30
मित्रानेच दारूच्या नशेत मुकेशची हत्या करून त्याचा मृतदेह वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीत गाडला होता
कल्याण : रेल्वेच्या पडीक वसाहतीमध्ये राहण्याच्या वादातून मुकेश पोरेड्डीवार या मित्राची हत्या करणाऱ्या बबलू ऊर्फ गुलामअली बदरे आलमखान आणि अकील अहमद कलीमुद्दीन खान या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, एका भटक्या कुत्र्यामुळे या हत्येचा उलगडा झाल्याचे समोर आले असून, चार तासांतच दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मित्रानेच दारूच्या नशेत मुकेशची हत्या करून त्याचा मृतदेह वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीत गाडला होता. या बांधकामाच्या ठिकाणी एक कुत्रा सतत जमीन उकरत असताना काही मजुरांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता जमिनीत काहीतरी गाडले असल्याची बाब समोर आली. तसेच प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे तेथे एका व्यक्तीचा मृतदेह पुरला आहे, अशी माहिती त्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी पोलीस पथक तयार केले. पोलिसांनी काही तासांतच मृतदेह कोणाचा आहे, याचा शोध घेतला.
दारूच्या नशेत भांडण
मुकेश हा संबंधित ठिकाणी बांधकामाला पाणी मारण्याचे काम करत होता. मुकेश आणि त्याचा सहकारी कामगार मित्र बबलू ऊर्फ गुलामअली हे एकाच खोलीत राहत होते. जेवणानंतर दारूच्या नशेत या दोघांमध्ये बुधवारच्या रात्री भांडण झाले. या भांडणात गुलाम अली याने अकील खान याच्या मदतीने मुकेशला ठार मारले.