हतबलता! दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या, ओल्या दुष्काळाशी सामना करायचा कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 05:14 PM2020-10-16T17:14:12+5:302020-10-16T17:14:45+5:30
Suicide : धामणगावात एकाच दिवशी दोन युवा शेतकाऱ्यांची आत्महत्या
धामणगाव रेल्वे (अमरावती) : दोन वर्षांपासून नापिकी आणि त्यात यंदाही सोयाबीन व कपाशी पिके घरात येणार नाही, या निराशेपोटी दोन युवा अविवाहित शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव निस्ताने व उसळगव्हाण येथे घडली. प्रीतम भास्करराव ठाकरे (३०, रा. बोरगाव निस्ताने) व दीपक प्रमोद डफळे (२५, उसळगव्हाण), अशी मृतांची नावे आहेत.
बोरगाव निस्ताने येथील प्रीतम ठाकरे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. यंदा अधिक पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचले. परिमाणी, कपाशी पीक पिवळे पडले. त्या विवंचनेत प्रीतमने राहत्या घरीच गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सोनारा सेवा सहकारी सोसायटीचे दीड लाखांच्या जवळपास कर्ज आहे. त्यांच्यामागे आई, भाऊ असा परिवार आहे.
तालुक्यातील उसळगव्हाण येथील दीपक डफळे या शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी १ वाजता स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडिलोपार्जित पाच एकर शेती तो सांभाळत होता. त्याने शेतात सोयाबीन व तूर लावली होती. मात्र, सोयाबीनचे पीक घरी येणार नाही, याची शाश्वती आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या शेतीवर देवगावस्थित एका बँकेचे दोन लाखांच्या जवळपास कर्ज असल्याचे नातेवाईक प्रदीप डफळे यांनी सांगितले. त्याच्यामागे आई, वडील व लहान भाऊ आहे.