वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! पोलिसांपुढे आव्हान :तालुक्यात डझनभर घरे फोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:31 AM2019-05-07T01:31:35+5:302019-05-07T01:31:53+5:30
वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडली.
वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून ६१ हजार रु पये किंमतीचा रोख रकमेसहित ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल रात्री वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या नित्याच्याच चोऱ्यांमुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
वाडा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला असून वाडा शहर, गोºहे, नाणे, कुडूस, मेट, शिरीषपाडा, वावेघर, नेहरोली आदी ठिकाणी घरे दुकाने फोडून व दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे खुपरी येथील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेषत: गोºहे येथील दुकानदार प्रकाश खिलारे यांचे दुकान फोडल्याने खिलारे यांना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनी तालुक्यातील नागरिक धास्तावले असून गुन्हेगारांना कधी चाप बसेल याच्या प्रतिक्षेत आहेत.
शनिवारी (दि. ४)रात्रीच्या सुमारास सोनाळे परिसरातील मोजमध्ये तीन घरे, बिलघर मध्ये आठ घरे व सोनाळे मध्ये एक घर अशी एकूण बारा घरे फोडून चांदी व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या बारा घरफोड्यांमध्ये नामदेव पठारे, बाळकृष्ण पठारे, एकनाथ गव्हाळे, भास्कर गव्हाळे, सुभाष गव्हाळे, बबन जोगमार्गे, शांता शांताराम पठारे, काशिनाथ गव्हाळे, किसन दळवी, वैभव पठारे मनोहर घागस यांच्या घरांचा समावेश असून हे सर्व नोकरी धंदानिमित्त विविध शहरात राहत असल्याने व गावाकडील घरे बंद असल्याने चोरट्यांनी येथे डल्ला मारला आहे.
तसेच रविवारी (दि. ५) वाडा शहरातील शिवाजी नगर येथे राहणा-या उदय नाईक व कल्पना ठाकरे यांची घरे फोडून नाईक यांच्या घरातील एक हि-याचा पावणेतीन लाख रु पये किंमतीचा हार, दोन अंगठ्या, कर्णफुले व ४० हजार रु पये रोख रक्कम तर ठाकरे यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व किरकोळ सामान असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अलका करडे करीत आहेत.
दरम्यान, तालुक्यात लग्न सराई जोरदार सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत नागरिकांचे जाणे येणे सुरू असते. पंरतु पोलिसांच्या नाका बंदी व गस्तीमुळे सामान्य नागरिकालाही पोलिसांच्या चौकशीला व कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत. तर पोलीस ही कामगिरी लवकरच पार पाडू असा निर्वाळा देत आहेत.