आई ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; रबाळेतील घटना; अन्य कारणांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 07:24 AM2022-08-05T07:24:37+5:302022-08-05T07:25:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : रबाळेत राहणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रबाळेत राहणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई ओरडल्याचे देखील पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. यातूनच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात असून, इतरही काही कारण आहे का? याचाही अधिक तपास रबाळे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
रबाळे एमआयडीसीमधील संभाजी नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. आरती सोनार (११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, ती महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून घरी आली असता, हा प्रकार उघड झाला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये आरतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आई-वडील कामावर तर मोठी बहीण खेळाच्या सरावाला गेली असताना हा प्रकार घडला आहे. ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेत शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई तिला ओरडली होती. त्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. परंतु, ती काही दिवसांपासून तणावात होती, असेही काहींचे म्हणणे आहे. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना त्याबाबत पुष्टी झालेली नाही. शिवाय कोणाविरोधात तक्रार नसल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले. यामुळे तिने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.
पालकांची चिंता वाढली
पाचवीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे बालगुन्हेगारी वाढत असताना, काहीजण अमली पदार्थांच्या देखील आहारी जाऊ लागले आहेत. त्यातच बालवयात मुलांवर येणाऱ्या मानसिक दडपणाच्या कारणांवरून पालकांची चिंताही वाढली आहे.