शाळेत फी भरण्याचा तगादा लावल्याने गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:36 PM2018-10-10T16:36:56+5:302018-10-10T16:50:58+5:30
अजयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण उघडकीस आले आहे.
वसई - शाळेतील फी न भरल्याने शिक्षकाने सतत तगादा लावल्याने अजय दुबे (वय 14) या विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वसईमध्ये वालीव पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामुळे त्याच्या आत्महत्येचं कारण उघडकीस आले आहे.
अजयची घरची परिस्थिती बेताची होती असून अजयचे वडील रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. शाळेची फी भरणा शिल्लक असल्याने शिक्षकाकडून सतत विचारणा होत होती. एकदा तर शिक्षकाने भरलेल्या वर्गात फी कधी भरणार?, असं विचारलं. जर फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, असे म्हटले होते. अजयने आपल्याला शाळेत ओरडतात, फी केव्हा भरणार असं वडिलांना विचारलं होतं. आठवी इयत्तेत शिकणारा अजय अभ्यासात हुशार होता. फी भरता येत नसल्याने त्याला पुढील शिक्षणाबाबत चिंता वाटायला लागली होती. त्याच्यातच त्याचा मोबाईल फोन हरवला होता. ही गोष्ट घरी कळाली तर आपलं काही खरं नाही अशी भीती अजयला वाटत होती. या सगळ्या गोष्टींचा ताण आल्याने त्याने अखेर आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविली आहे.