शिक्षक ओरडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या; सायन-कोळीवाडा परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:15 AM2018-10-08T02:15:55+5:302018-10-08T02:16:36+5:30
शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली.
मुंबई : शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायन कोळीवाडामध्ये जुली महेंद्र शर्मा (१३) कुटुंबीयांसोबत राहायची. येथील क. दा. गायकवाड पालिका शाळेत ती सहावीच्या वर्गात शिकत होती. गेले दोन दिवस शाळेत गैरहजर राहिल्याने, शनिवारी शिक्षक अनिल पाल यांनी तिला अनुपस्थितीचे कारण विचारले. त्यात तिचा अभ्यासही अपूर्ण होता. वर्गात सर्वांसमोर शिक्षक ओरडल्याने तिने रडत रडत घर गाठले.
याबाबत घरच्यांना सांगून तिने पोटमाळ्यावर स्वत:ला कोंडून घेतले. रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. ती बराच वेळ बाहेर न आल्याने घरच्यांनी पोटमाळा गाठला. तिला आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा जुली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
तिला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे शर्मा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. प्राथमिक तपासात शिक्षक सर्वांसमोर ओरडले, म्हणून जुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश काटकर यांनी दिली.