विश्वासघातच करायचा होता, तर प्रेम का केलंस? सुसाईड नोट लिहून प्रियकरानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:06 PM2021-12-10T13:06:17+5:302021-12-10T13:06:32+5:30
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; फोटोमागे लिहिली सुसाईड नोट
कानपूर: एका विद्यार्थ्यानं वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपुरात घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. प्रेयसीनं विश्वासघात केल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख नोटमध्ये आहे. मृत्यूनंतर माझ्या प्रेयसीला त्रास देऊ नका, असंही नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
प्रेयसीच्या फोटोमागे काही ओळी लिहून विद्यार्थ्यानं चादरीनं गळफास लावत स्वत:चं जीवन संपवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. विद्यार्थ्याचे वडील लष्करात असून तो स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. मृत विद्यार्थी मूळचा जालौनचा रहिवासी आहे. कानपूरच्या कल्याणपूरमधील पी ब्लॉकमध्ये असलेल्या वसतिगृहात राहून तो बँकेच्या परिक्षेची तयारी करत होता.
आत्महत्येची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून पंख्याला लटकत असलेला मृतदेह खाली उतरवला. खोलीत असलेल्या आरशावर पोलिसांना एका तरुणीचा फोटो सापडला. तरुणीनं विश्वासघात केल्याचं शिवमनं फोटोच्या मागे लिहिलं होतं. 'तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस. विश्वासघातच करायचा होता तर मग प्रेम का केलंस? माझ्यानंतर तिला त्रास देऊ नका,' असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी तरुणाची सुसाईड नोट आणि फोन ताब्यात घेतला आहे.
शिवम तीन महिन्यांपूर्वी वसतिगृहात आला होता. त्याचा स्वभाव अतिशय शांत होता. तो फार कोणाशी बोलायचा नाही. कोचिंग झाल्यानंतर तो आपल्याच खोलीत असायचा. त्याचे फार कोणी मित्रदेखील नव्हते, अशी माहिती वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली.