“दादा, पप्पांचे पैसे वाया घालवू नको, चांगला अधिकारी हो; सुसाईड नोट लिहून बहिणीनं घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:57 PM2021-07-19T20:57:59+5:302021-07-19T20:58:54+5:30
गुमनावारा येथे राहणारी जगमोहन यांची २१ वर्षीय मुलगी यशस्वी रविवारी रात्री तिच्या रुममध्ये एकटीच होती.
उत्तर प्रदेशच्या झांशी जिल्ह्यात एका विद्यार्थीनी सायबर गुन्ह्याची शिकार झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. गळफास घेण्यापूर्वी मुलीने सुसाईड नोट लिहिली होती ती पोलिसांनी जप्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. झांशी जिल्ह्यातील नवाबाद येथील गुमनावारा येथे ही घटना घडली आहे.
गुमनावारा येथे राहणारी जगमोहन यांची २१ वर्षीय मुलगी यशस्वी रविवारी रात्री तिच्या रुममध्ये एकटीच होती. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोटही आढळली. यशस्वीने दोन महिन्यापूर्वी एका वृत्तपत्रात जाहिरात वाचली होती. त्यात एका नामांकित आयुर्वेदिक कंपनीशी साधर्म्य असलेल्या कंपनीची जाहिरात प्रकाशित झाली होती. जाहिरातीत घर बसल्या महिन्याला २५ हजार रुपये कमवण्याची संधी असल्याचं म्हटलं होतं.
या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. अर्ज दिल्यानंतर कंपनीकडून रिप्लाय आला. कंपनीने सुरुवातीला ४८५०० रुपये भरण्यास सांगितले. यशस्वीने टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले. त्यानंतर कंपनी प्रतिनिधीचा फोन बंद लागला. त्यामुळे यशस्वीचं मानसिक खच्चीकरण झालं. ती चिंतेत होते. त्याच कारणानं रविवारी रात्री तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या रुममध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली.
या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, पप्पा, हे कोणालाही दाखवू नका, तुमच्या समस्येचं आणि घरगुती भांडणाचं मूळ मी आहे, जी आता राहणार नाही. तुम्ही सिगारेट सोडून द्या, भाऊ, आई वडिलांची काळजी घे. ते खूप चांगले आहेत. मी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. तू अधिकारी बन. पप्पांचे पैसे वाया घालवू नको. थँक्यू सो मच. मला माफ करा, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते. मी माझ्या स्वत:च्या मर्जीनं जीव देत आहे. मुलीनं उचललेल्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर आईवडील धाय मोकलून रडत आहेत.