कुरिअरबाबत चौकशी करणे विद्यार्थिनीला पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:07 AM2020-03-13T01:07:01+5:302020-03-13T01:07:07+5:30
दादरमध्ये राहणाऱ्या तक्रारदार तरुणीने ८ मार्च रोजी ऑनलाइन टी-शर्ट खरेदी केले.
मुंबई : ऑनलाइन खरेदी केलेल्या टी-शर्टचे कुरिअर कुठपर्यंत आले, याबाबत चौकशी करणे एमबीबीएस एमडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला भलतेच महागात पडले. या चौकशीदरम्यान तिच्या खात्यातून तब्बल १ लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणी तिच्या तक्रारीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दादरमध्ये राहणाऱ्या तक्रारदार तरुणीने ८ मार्च रोजी ऑनलाइन टी-शर्ट खरेदी केले. मात्र ते दिलेल्या वेळेत न आल्याने तिने बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गुगलवरून ब्ल्यूडार्ट कुरिअर सेवेचा क्रमांक मिळवून त्यावर संपर्क साधला. तिने कुरिअरबाबत विचारणा करताच त्यांनी एक लिंक पाठवून त्यात तपशील भरण्यास सांगितले. लिंक उघडताच त्यात सगळीकडे ब्ल्युडार्ट दिसत असल्याने तिला लिंक खरी वाटली. फोनवरील व्यक्तीने सांगितल्यानुसार तिने त्यात २ रुपयांचा आॅनलाइन व्यवहार केला. त्यानंतर तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढल्याचा संदेश आला. विद्यार्थिनीने संबंधित कॉलधारकाकडे याबाबत विचारणा करताच, थोड्या वेळात पैसे पुन्हा खात्यात येतील, असे त्याने सांगितले. मात्र पैसे परत येण्याऐवजी तिच्या खात्यातून आणखी ६० हजार रुपये काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण ८ व्यवहारांमध्ये तब्बल १ लाख रुपये काढण्यात आले.