विद्यार्थिनींना मारहाण; बिहारमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा, ९ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:34 AM2018-10-09T02:34:58+5:302018-10-09T02:35:09+5:30
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यात एक अल्पवयीनही असल्याचे सांगितले जात आहे. यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू आहे. पोलिसांनी एकूण १९ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरभंगाचे आयजी पंकज दराद यांनी शाळेतील विद्याीर्थनींशी चर्चा करून त्यांना शब्द दिला की, सर्व आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. दरम्यान, ५५ जखमी मुलींपैकी १२ मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंकज दराद यांनी सांगितले की, सुरक्षेसाठी शाळा आणि हॉस्पिटल परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला या मुलींनी सांगितले की, जवळपासची काही मुले शाळेच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर लिहीत होते. याला मुलींनी विरोध केला. त्यानंतर ही मुले आपल्या कुटुंबियांसह या शाळेत
घुसली.
तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी टष्ट्वीट करीत नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करून त्यांचा उल्लेख बेशर्म कुमार असा केला आहे. त्यांनी मुजफ्फरपूरच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. त्यांनी टष्ट्वीट केले आहे की, मुजफ्फरपूरमध्ये ३४ मुलींवर बलात्कारानंतर आता छळास विरोध करणाऱ्या ७० मुलींवर हल्ला झाला आहे. नितीशकुमार गप्प का आहेत?