शाळेत दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांनीच दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 06:36 PM2019-01-19T18:36:24+5:302019-01-19T18:37:48+5:30
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दादागिरी करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी एमएचबी पोलिसांत तक्रार दाखल केली.
मुंबई - शाळेत दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी मिळून चोप दिला आहे. या तिघांवरही तो दादागिरी करत असल्याने कंटाळून या विद्यार्थ्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं होतं. दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला चोपत असताना या तिघांमधल्या एकाने व्हिडीओ रेकॉर्डींग केला आणि ते या मुलाच्या वडिलांना पाठवून दिला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दादागिरी करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी एमएचबी पोलिसांत तक्रार दाखल केली.
12 जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणाबाहेर या विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला गाठून त्याला बसच्या मागे नेलं आणि अद्दल घडवण्यासाठी चोप दिला. पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या तीन विद्यार्थ्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ही मुलं शाळकरी असल्याने त्यांच्याविरुद्ध अधिक कारवाई करण्यात आली नाही. मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी या तीन विद्यार्थ्यांचे पालकांच्या उपस्थितीत समुपदेशन केल्याचे सांगितले.