भांडुपमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 02:10 PM2018-08-16T14:10:11+5:302018-08-16T14:46:15+5:30
गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
मुंबई - भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलावाजवळ असलेल्या सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हि घटना आज वाजताच्या सुमारास घडली असून विषबाधा झालेल्या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सह्याद्री विद्यामंदिर शाळेत आज सकाळी 11 खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दरम्यान खिचडी खाल्ल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला पोटात मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची मुलुंडचे आमदार तारा सिंग यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. मात्र, नुकतेच गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या औषध आणि अन्न पदार्थ हे पालकांसाठी चिंतेचे विषय बनले आहेत.
सकाळी 11 वाजता या शाळेतील मुलांना जेवणात डाळ आणि खिचडी देण्यात आली होती. जेवणानंतर अर्ध्या तासानं मुलांच्या पोटात दुखू लागलं, त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्राथमिक माहितीनुसार, या मुलांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे.