फी भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाकडून अपमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:23 AM2018-10-11T01:23:22+5:302018-10-11T01:24:12+5:30
घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली.
नालासोपारा (पालघर) : घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
सागर हा आदर्श चाळीत आई-वडील व आपल्या लहान भावासह राहत होता. वडील टॅक्सी चालक आहेत. आत्महत्या करताना सागरने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. वसई पूर्व येथील गोलाई नाका या परिसरातील इमानुल मिशन स्कूलमध्ये सागर नववीत शिकत होता. सागरची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला फी भरणे शक्य होत नव्हते. त्यासाठी शिक्षकांकडून सतत विचारणा होत होती. एका शिक्षकाने भर वर्गात फी कधी भरणार? असे विचारले. जर फी भरली नाही, तर परीक्षेला बसू देणार नाही, असेही सांगितले होते. त्यानंतर, सागरच्या वडिलांनी शाळेची फी लवकर भरू, असे आश्वासन त्याला दिले होते.
नवव्या इयत्तेत शिकणारा सागर अभ्यासात हुशार होता. शुक्रवारी शिक्षकाने लवकरात लवकर फी भर, अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल, असे त्याला सांगितले. त्यानंतर, त्याने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. वडील शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत गेले. मात्र, शिक्षक भेटले नाहीत. सोमवारी सागर शाळेत जाऊन दुपारी १ वाजता घरी परतला. वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सागरने गळफास घेऊन आत्महत्या केली. वालीव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
मोबाइल गेला चोरीला
याबाबत अशीही माहिती समोर आली आहे की, सागरचा मोबाइल दोन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्या तणावातून त्याने हे पाऊल उचलले आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.