स्टंटबाजी पडली महागात! गोव्यात मुलासह वडिलांची कारागृहात रवानगी
By काशिराम म्हांबरे | Published: July 17, 2023 11:45 AM2023-07-17T11:45:13+5:302023-07-17T11:45:48+5:30
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
म्हापसा: भर रस्त्यावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करण्याचा प्रकार म्हापसा- डांगी कॉलनी येथील पिता-पुत्राला चांगलाच महागात पडला. दुचाकी नावावर असलेल्या वडिलांनी परवाना नसताना मुलाला वाहन चालवण्यास दिली आणि मुलाने रस्त्यावर धोकादायकरित्या स्टंटबाजी केली. त्यामुळे या दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी स्टंट करणाऱ्या युवकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला. तसेच, त्याला ताब्यात घेतले. स्टंट करताना त्या मुलाने हेल्मेटचा देखील वापर केला नव्हता. त्या युवकाने पहिला स्टंट ७ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील न्यायालयीन जंक्शनवरील रस्त्यावर केला होता, तर मे २०२३ च्या दिवशी स्टंट करणारा त्याचा दुसरा व्हिडियो व्हायरल झाला होता.
यासिन मुल्ला ( २० वय, डांगी कॉलनी ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. चौकशी दरम्यान परवाना नसतानाही त्याच्या वडिलांनी आपली दुचाकी त्याला दिल्याचे मान्य केले. त्यामुळे मुलाच्या अटकेनंतर त्याचे वडिल अब्दुल मुल्ला यांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच स्टंटसाठी वापरण्यात आलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली. या प्रकरणात पोलिसांनी २७९, ३३६ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम ३, १२९, १७७, १८०, १८४, १९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.