लेटरबॉम्ब टाकणारा उपनिरीक्षक सापडला; अधिकाऱ्यांमध्ये रजासत्र सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 09:41 AM2022-03-12T09:41:55+5:302022-03-12T09:42:06+5:30
कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठांकडून गैरकारभार होत असून, त्यांच्याकडून आपल्याला नाहक प्रकरणात गुंतवल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांनी केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत बेपत्ता झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा अखेर शोध लागला. नैराश्यात त्यांनी घर सोडत जीवाचे बरेवाईट करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, त्यांच्या मनधरणीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. अशातच शुक्रवारी नातेवाइकांनी त्यांचा शोध लावला.
कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठांकडून गैरकारभार होत असून, त्यांच्याकडून आपल्याला नाहक प्रकरणात गुंतवल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांनी केला होता. तर हा मनस्ताप असह्य झाल्याने त्यांनी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्री यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांचा लेटरबॉम्ब टाकून अज्ञातवासात गेले होते. यामुळे नवी मुंबई पोलीस दलात संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी टाळण्यासाठी रजासत्र सुरू झाले होते. तर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनीही उपनिरीक्षक बच्छाव यांच्या पत्नीचा जबाब घेतला होता. पोलीस दलातच असलेल्या त्यांच्या पत्नीनेही आपले पती वरिष्ठांकडून होत असलेल्या जाचाने त्रस्त होते, असे सांगितले होते.
शिस्तभंगाच्या कारवाईचा धाक
बच्छाव यांच्यावर पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणास्तव शिस्तभंगाच्या कारवाईचाही धाक दाखवून त्यांना समोर येण्यास भाग पाडले जात होते. त्यांचा शोध न लागल्यास संबंधित सर्वच पोलिसांपुढच्या अडचणी अधिक वाढल्या असत्या.