पाणबुड्यांची माहिती लीक; कमांडरसह ५ जण अटकेत, सीबीआयची कारवाई; महिनाभर शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:09 AM2021-10-27T05:09:43+5:302021-10-27T05:10:15+5:30
Submarine information leaked : या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी गेल्या महिन्यापासून गुप्त ऑपरेशन राबविण्यात आले.
नवी दिल्ली : भारतीय नाैदलाच्या पाणबुड्यांबाबत गाेपनीय माहिती फोडल्याप्रकऱणी सीबीआयने मुंबईतील कमांडर रँकच्या अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक केली आहे. सीबीआयला गोपनीय माहिती लीक होत असल्याबाबत सुगावा लागला होता. या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी गेल्या महिन्यापासून गुप्त ऑपरेशन राबविण्यात आले.
त्यानुसार सर्वप्रथम नैादलाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह चाैघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चाैकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसह १९ ठिकाणी छापे मारले. त्यानंतर कमांडरला अटक करण्यात आली. हा अधिकारी मुंबईत नौदलाच्या वेस्टर्न कमांडमध्ये कार्यरत आहे. माहिती पुरविण्यासाठी त्याला माेठ्या प्रमाणावर लाच मिळाल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या कारवाईतून सीबीआयने महत्त्वाच्या कागदपत्रांसह डिजिटल पुरावे जप्त केले होते. त्यातून आणखी माहिती गाेळा करण्यात येत असल्याचे सीबीआयने सांगितले. पण अटक केलेल्यांची नावे उघड केलेली नाहीत.
सीबीआयच्या भ्रष्टाचारविराेधी पथकावर या प्रकाराच्या मुळाशी जाण्याची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. या प्रकरणामागे परदेशी गुप्तचर संस्थांचा सहभाग होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांची फाॅरेन्सिक तपासणी करण्यात येत असून, त्यातूनच बरेच काही उघड हाेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही सहभागाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.