नायब तहसीलदारांचा पाणबुडी विद्युत पंप लांबविला
By सूरज पाचपिंडे | Published: May 13, 2023 07:26 PM2023-05-13T19:26:02+5:302023-05-13T19:29:33+5:30
शेजारील दोन शेतकऱ्यांच्या वायरचीही चोरी
धाराशिव : अज्ञात व्यक्तीने शहरातील निवृत्त नायब तहसीलदारांच्या शेतातील पाणबुडी विद्युत पंप व शेजारील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील वायर चोरून नेले. ही घटना १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील तांबरी विभाग भागात राहणारे निवृत्त नायब तहसीलदार सुभाष पवार यांची शहरातील आठवडी बाजाराच्या पूर्वेस शेतजमीन आहे. त्यांनी शेतीपिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत पाणबुडी विद्युत पंप व केबल वायर बसविले होते. १२ मे रोजी विहिरीत विद्युत पंप नसल्याची माहिती भागीण रमेश चव्हाण यांनी पवार यांना दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, विहिरीतील १५ हजार किमतीचा पाणबुडी पंप व १०० मीटर केबल वायर नसल्याचे आढळून आले. त्यांनी शेजारील शेतकरी अर्जुन पवार व बालाजी डुमणे यांना विचारणा केली असता, त्या दोघांनीही स्वत:च्या शेतातील १०० मीटर वायर चोरीस गेल्याचे सांगितले. याप्रकरणी सुभाष पवार यांनी १३ मे रोजी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला.