आंबेगाव तालुक्यात चिमुरडीचा जीव घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:09 PM2019-03-25T17:09:52+5:302019-03-25T17:12:55+5:30
खेळत असलेल्या श्रुतिकावर मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक हल्ला केला होता
निरगुडसर : साकोरे ता आंबेगाव येथे रविवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५) रा जऊळके. ता. खेड) या चिमुकलीला ठार केले होते. या बिबट्याला अखेर सोमवारी (दि. २५) रोजी पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
पाच दिवसांपूर्वी श्रुतिका व तिची आई स्वाती थिटे या मामा अंकुश कडूसकर यांच्याकडे राहण्यास आल्या होत्या. घरासमोरील शेतात जनावरांसाठी मका चारा तिच्या आजी कुसुम कडूसकर व स्वाती थिटे कापत असताना जवळच खेळत असलेल्या श्रुतिकावर मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक हल्ला केला होता.त्यावेळी बिबट्या श्रुतिकाला उचलून पळू लागला, आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले ,तो पर्यंत बिबट्याने श्रुतिकाला टाकून धूम ठोकली,श्रुतिकाला गळ्याला जखम झाली होती.यावेळी प्रदीप बबन कडूसकर यांनी तिला आपल्या वाहनात तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी पहाटे हा बिबट्या वनविभागाच्या पिंजर्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास घेतला.