‘महामारीच्या आधारे सुधा भारद्वाज यांची जामिनावर सुटका करू शकत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 04:29 AM2020-07-01T04:29:01+5:302020-07-01T04:29:14+5:30
कोविड-१९च्या कारणामुळेही त्यांना दिलासा देऊ शकत नाही. कारण त्या बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी)च्या सदस्या असल्याचे पुरावे असल्याचा दावा, तपास यंत्रणेने केला आहे.
मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज या जामीन अर्ज करून कोरोना या महामारीचा गैरफायदा घेत असल्याचे म्हणत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला आहे. एनआयएने गेल्या आठवड्यात याप्रकरणी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
भारद्वाज यांना कोणताही दिलासा मिळू शकत नाही. कोविड-१९च्या कारणामुळेही त्यांना दिलासा देऊ शकत नाही. कारण त्या बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी)च्या सदस्या असल्याचे पुरावे असल्याचा दावा, तपास यंत्रणेने केला आहे. सशस्त्र बंडखोरांच्या प्रगतीसाठी त्यांना माहिती देण्याच्या कामात भारद्वाज अन्य आरोपींबरोबर काम करत होत्या, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सध्याचे केंद्र सरकार अस्थिर करण्यासाठी भारद्वाज सक्रिय होत्या. भारद्वाज यांना कारागृहात सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत आणि आवश्यक असेल तेव्हा सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात येतील, असेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.