आमदार कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न, भेंडी बाजार येथील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 07:09 AM2023-01-02T07:09:15+5:302023-01-02T07:10:29+5:30
३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पटेल यांच्या कार्यालयात एक व्यक्ती स्वतःवर चाकूने वार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले.
मुंबई : आमदार भेटले नाहीत म्हणून ४० वर्षीय व्यक्तीने नशेमध्ये आमदार अमीन पटेल यांच्या कार्यालयातच स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भेंडी बाजार येथे समोर आली आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जे. जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले मंगेश ब्राह्मणे (३८) यांच्या फिर्यादीवरून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पटेल यांच्या कार्यालयात एक व्यक्ती स्वतःवर चाकूने वार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांच्या चौकशीत, त्याचे नाव मोहमद हुसेन इनायतअली खान (४०) असल्याचे समजले. १२:५०च्या सुमारास नारळ तोडण्याचा चाकू हातात घेत तो कार्यालयात आला. आमदारांना भेटायचे आहे सांगताच, तेथील कर्मचाऱ्यांनी आमदार अधिवेशनासाठी नागपूरला असल्याचे सांगितले. तसेच त्याला चाकू खाली ठेवण्यास सांगितले. मात्र, आमदारांना भेटू दिले नाही तर आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. काही समजण्याच्या आतच त्याने हातातील चाकूने डोक्यावर वार केले.
खान हा पूर्वी भेंडीबाजार परिसरात अंगठी विकण्याचा व्यवसाय करायचा. ३० तारखेला भेंडीबाजार परिसरात पाण्याची पाइपलाइन देण्यासाठी नशेमध्ये खानने सुरक्षा रक्षकांशी वाद घातला. तेथून तो आमदारांच्या कार्यालयात गेला व त्याने स्वतःवर चाकूने वार करून घेतले.
नशेमध्ये कृत्य ...
खान हा नशेमध्ये हातात चाकू घेऊन कार्यालयात आला. मी अधिवेशनासाठी नागपूरला असल्याचे त्याला सांगून, चाकू खाली ठेवण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, त्याने नशेमध्ये स्वतःच्या डोक्यावर मारून घेतले. याबाबत समजताच जे. जे.तील डॉक्टरांशी संपर्क करून त्याला तत्काळ उपचार उपलब्ध करून दिले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
- अमीन पटेल, आमदार