Suicide Attempt : बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 09:12 PM2021-03-11T21:12:47+5:302021-03-11T21:13:38+5:30
Suicide Attempt : याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाघ यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्याच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवल्याने घटना टळली. पांडुरंग वाघ असं या व्यक्तीचं नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाघ यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे.
पांडुरंग वाघ हे अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी राज्य सरकारकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी ८ लाख ७२ हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केलं होतं. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. स्थानिकांच्याच्या सततच्या विरोधामुळे वाघ यांना नुकसान होत होतं. शासनाकडून वाळू उपसण्याचं काम मिळाल्यानंतर सुद्धा वाघ त्यांना ते काम करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावं लागत होतं. वाघ यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्यात त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा सरकार दरबारी धाव घेतली. शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे म्हणून वाघ यांनी पाठपुरावा सुरू केला होता.
वाघ यांनी भरलेले ८ लाख ७२ हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मथु दुर्घटना टळली. गावदेवी पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली.